इंडियन नेव्ही : टेक्निकल कॅडेट एन्ट्री स्कीमसाठी १२ वी विज्ञान उत्तीर्ण अविवाहित पुरुष व महिला उमेदवारांकडून दि. २० जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
प्रवेश प्रकार – १०+२ बी. टेक कॅडेट एन्ट्री स्कीम (परमनंट कमिशन)
प्रशिक्षणाची सुरुवात – जानेवारी २०२५
भरती ब्रांच – एक्झीक्युटीव्ह अँण्ड टेक्निकल ब्रांच – ४० (महिला ८, पुरुष ३२)
पात्रता – दोन्ही ब्रांचसाठी उमेदवार फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयांमध्ये सरासरी किमान ७० % गुणांनी १२ वी विज्ञान उत्तीर्ण असावा तसेच १० वी किंवा १२ वी इंग्रजी विषयास किमान ५० % गुण असणे आवश्यक. तसेच उमेदवार जेईई मेन-२०२४ परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचा जन्म दि. ०२ जुलै २००५ ते ०१ जानेवारी २००८ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उंची – किमान १५७ सें.मी. वजन उंचीच्या प्रमाणात असावे. दृष्टी – चष्म्याशिवाय दूरदृष्टी ६/६, ६/९ करेक्टेबल टू ६/६, ६/६ अशी असावी. उमेदवारास रातआंधळेपणा तसेच रंगांधळेपणा नसावा.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड SSB मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची जेईई मेन २०२४ मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. यामधील उमेदवारांची SSB मुलाखत घेण्यात येईल. त्याचे दोन टप्पे असून पहिल्या टप्प्यात बुध्दिमत्ता चाचणी, चित्रचाचणी आणि समूहचर्चा यांचा समावेश असेल. जे उमेदवार पहिल्या चाचणीत अयशस्वी होतील त्यांना त्याच दिवशी परत पाठविले जाईल. दुसऱ्या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचणी, ग्रुपटास्क आणि मुलाखत यांचा समावेश असेल. यामधील उत्तीर्ण उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. सदरच्या मुलाखती पाच दिवस चालतील. जे उमेदवार पहिल्यांदाच एसएसबी चाचण्यांसाठी हजर राहतील त्यांना जाता – येताचा प्रवासखर्च दिला जाईल.
मुलाखत दिनांक आणि ठिकाण – सप्टेंबर २०२४ पासून मुलाखत बेंगलोर / भोपाळ /विशाखापट्टणम/कोलकत्ता येथे घेतल्या जातील.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल/ एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड इ) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
प्रशिक्षण – उमेदवारांचे प्रशिक्षण जानेवारी २०२५ मध्ये सुरु होईल. निवडलेल्या उमेदवारांना कॅडेट म्हणून स्वीकारले जाईल. त्यानंतर त्यांना नावल अकादमी, एझिमला, केरळ येथे इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन इंजिनिअरींग/मेकॅनिकल इंजिनिअरींग मधील बी.टेक कोर्स पूर्ण करावा लागेल. या कोर्स दरम्यान कॅडेटना इंजिनिअरींग, एक्झीक्युटिव्ह किंवा इलेक्ट्रीकल ब्रँच दिली जाईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची बी.टेक. पदवी दिली जाईल. बी.टेक पदवीचा सर्व खर्च नेव्हीद्वारे केला जाईल.
वेतनश्रेणी – उमेदवाराचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्यास सब लेफ्टनंट पदावर नियुक्त केले जाईल. उमेदवारांना सब लेफ्टनंट पदावर रु.१५,६००-३९,१००+ ग्रेड पे रु.५,४००+ मिलिटरी सर्व्हिस पे रु.१५,५०० असे वेतन अदा केले जाईल. याशिवाय नेव्हीच्या सर्व त्या आकर्षक सोयी, भत्ते, १ करोड रुपयांचा विमा, दरवर्षी ६० दिवसांची पगारी रजा, २० दिवसांची किरकोळ रजा, प्रवासात सवलत, स्वत:साठी तसेच कुटुंबासाठी विनामुल्य वैद्यकीय सेवा, कॅन्टीनच्या सोयी इ. सोयी, सवलती अदा केल्या जातील.
बढतीच्या संधी – उमेदवाराचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्यास सब लेफ्टनंट पदावर नियुक्त केले जाईल. उमेदवारांना परमनंट कमिशन मिळेल. त्यानंतरही गुणवत्तेनुरुप लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर अशा बढत्या दिल्या जातील. त्यापुढील कमांडर, कॅप्टन, रिअल अँडमिरल आणि व्हाईस अँडमिरल या सर्व बढत्या दिल्या जातील.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. ऑनलाईन अर्जासाठी www.joinindiannavy.gov.in ही वेबसाईट दि. ०६ जुलै २०२४ ते २० जुलै २०२४ पर्यंत खुली राहील. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त झालेला युजरनेम व पासवर्ड स्वतःजवळ नोंद करून ठेवावा. त्यांनतर अर्जामध्ये आवश्यक ती माहीती भरावी. अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा निळी बॅकराऊंड असलेला फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा निळी बॅकराऊंड असलेला फोटो,काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) १० वी गुणपत्र व प्रमाणपत्र ३) १२ वी गुणपत्र ४) जेईई मेन स्कोअर कार्ड ५) आधारकार्ड ६) डोमेसाईल प्रमाणपत्र उमेदवारांनी एसएसबी मुलाखतीच्या वेळेस ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊटसोबत वरील प्रमाणपत्रे, वयाचा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.joinindiannavy.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – २० जुलै २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *